चिपळूण आगारास नव्या बसची प्रतीक्षा
दहा नव्या गाड्यांची मागणी ; गळक्या छताचा पावसाळ्यात त्रास
चिपळूण: राज्य परिवहन महामंडळाच्या चिपळूण आगाराला नव्या बसची प्रतीक्षा आहे. चिपळूण आगारातून दहा बसची मागणी करण्यात आली आहे; मात्र अजून एकही बस प्राप्त झालेली नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात् एसटीचे बीद्र प्रवाशांच्या सेवेसाठी असे आहे; परंतु एसटी महामंडळाच्या बसची तुटलेल्या खिडक्या, फाटक्या सीट व पावसाळ्याच्या दिवसात गळक्या छतामधून टपकणारे पावसाचे पाणी अशा खिळखिळ्या बसेस प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा कल वाढला आहे; परंतु प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक मार्गावरील फेऱ्या वेळेवर सोडल्या जात नाहीत. चिपळूण आगारात सध्या १०५ बस आहेत. १० नव्या बसची मागणी करण्यात आली आहे. चिपळूणपेक्षाही उत्पन्नात कमी असलेल्या गुहागर आगाराला पाच नव्या बस मिळाल्या; मात्र चिपळूण आगाराला अजून प्रतीक्षा आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग अजून रेल्वेने जोडला गेलेला नाही. त्यामुळे कुंभार्ली घाटमार्गे पुणे, कोल्हापूर, सांगली, बेळगाव, सातारा मार्गावर सोडण्यात येणाऱ्या फेऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते; मात्र एसटीचे प्रवासी खासगी वाहतूकदार उचलतात. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होतो. चिपळूण आगाराला नव्या बस मिळाल्या तर त्या पश्चिम महाराष्ट्रातील विविध मार्गावर सोडता येतील. त्यातून एसटीला चांगले उत्पन्न मिळू शकते.