सीईओंच्या नावाचा गैरवापर करत शासनाची फसवणूक ; शिक्षकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या नावाचा गैरवापर करून मिशन आपुलकी योजनेअंतर्गत शाळेच्या मदतीसाठी लकी ड्रॉ कूपन छापणाऱ्या पदवीधर शिक्षकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण रावसाहेब किणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शिक्षकाचे नाव आहे. ही घटना ५ डिसेंबर २०२२ ते २४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत कशेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्राथमिक जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी भिकाजी मारुती कासार (५४, सध्या रा. सावली बंगलो, नाचणे, रत्नागिरी) यांनी शुक्रवारी (ता. १८) ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयित हे कशेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे पदवीधर शिक्षक म्हणून नेमणुकीस असताना जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ‘आदर्श शाळा कशेळी नं. १ या नावाने लकी ड्रॉ कूपन छापले. त्या कूपनवर गुणवत्तापूर्ण शाळा शैक्षणिक कमिटी व शाळा व्यवस्थापन कमिटी यांच्या सहयोगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कीतीकिरण पुजार यांच्या प्रेरणेने मिशन आपुलकी योजनेअंतर्गत शाळेच्या मदतीसाठी लकी ड्रॉ कूपन तयार केले व विविध बक्षिसांचा मजकूर लिहिला. संशयिताने शासनाची पूर्वपरवानगी न घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केली.