रत्नागिरीतील त्या १३ बांगलादेशीची शिक्षा संपताच मायदेशी पाठवणार!
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती
रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठवले जाणार आहे.
न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना ठोठावलेली सहा महिन्यांची शिक्षा येत्या १४ मे रोजी पूर्ण होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी, १५ मे रोजी, त्यांना बांगलादेश-भारत सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे प्रवेश केलेले काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची बाब उघडकीस आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत छापा टाकला आणि १३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या नागरिकांकडे चौकशी केली असता, ते भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही ठोस पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे या सर्वांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून वास्तव्य करत असल्याची खात्री पोलिसांना झाली. यानंतर रत्नागिरी पोलिसांनी पासपोर्ट अधिनियम आणि परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर, मागील महिन्यात या प्रकरणाची सुनावणी झाली. रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी सर्व १३ आरोपींना प्रत्येकी सहा महिने साधी कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आता या १३ बांगलादेशी नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी १४ मे २०२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता, दुसऱ्याच दिवशी त्यांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच शासकीय परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांचे एक विशेष पथक या १३ जणांना भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या ताब्यात देईल, असे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांवर वचक बसणार आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि केलेल्या कठोर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बांगलादेशीय नागरिकांची नावे: वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हजरतअली शेख, बाकिबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा, अब्दुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरुझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद लालतू मोंदल किताब अलीस.