रेल्वे ठेकदाराची ८ लाखाची फसवणूक ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः रेल्वेच्या ठेकेदाराचा विश्वासघात करुन जनरेटरच्या एका महिन्याचे १५ हजार व ४० महिन्यांचे भाड्याचे ६ लाख, व जनरेटरची किंमत २ लाख अशी ८ लाखाची फसवणूक केली. दोन संशयित ठेकेदारांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय कदम (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही) व कुणाल जय कदम (रा. भातगांव, ता. गुहागर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ११ डिसेंबर २०२१ सायंकाळी सहाच्या सुमारास टिके-रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीनिवासराव गोपालकृष्णय्या गोगीनेनी (वय ५७, रा. मिरजोळे पाडावेवाडी-कुवारबाव, रत्नागिरी) हे रेल्वे ठेकेदार आहेत. ते एल अॅण्ड टी कंपनीकडून रेल्वेची कामे घेतात. यातील संशयित जय कदम हा सिव्हिल ठेकेदार असल्याने तो त्यांच्या परिचयाचा होता. ११ डिसेंबरला टिके येथे एल अॅण्ड टी कंपनीच्या मालकिचा व फिर्यादी यांच्या ताब्यात असलेला जनरेटर जय कदम व कुणाल कदम यांना काही दिवसांकरता भाडेतत्वावर वापरायला दिला होता. तो स्वतःसाठी वापरून फिर्यादी यांना अद्याप परत केला नाही. जनरेटरच्या भाड्याचे ६ लाख व जनरेटरची किमंत २ लाख अशी ८ लाखाची विश्वासघाताने फसवणूक केली. या प्रकरणी रेल्वे ठेकेदार गोगीनेनी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.