
आईसह चुलत्यावर कोयतीने हल्ला ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील तरुणाने आई व चुलत्याला कोयतीने मारहाण व दुखापत केली. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक विजय नाखरेकर (वय २९, रा. नाखरेकरवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २५) रात्री साडेसातच्या सुमारास मिरजोळे-नाखरेकरवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विजय जगन्नाथ नाखरेकर (वय ६०, रा. मिरजोळे-नाखरेकरवाडी, रत्नागिरी) हे राहत्या घरात नाखरेकरवाडी येथे त्यांचा मोठा मुलगा ओंकार हे आंबा पेट्या भरत होते. अचानक संशयित अभिषेक आंबा पेट्याचे गवत कापण्यासाठी ठेवलेला कोयता हातात घेऊन घरात गेला आणि घऱामध्ये एकटीच उपासना करीत बसलेली फिर्यादिची पत्नी विशाखा विजय नाखरेकर हिला व चुलत भाऊ जयवंत बारक्या नाखरेकर (वय ६५) यांचेवर कोयत्याने मारहाण करुन दुखापत केली. या मारहाणीत विशाखा नाखरेकर व जयवंत नाखरेकर हे जखमी झाले. या प्रकरणी विजय नाखरेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.