
कशेडी बोगद्याजवळ दोन कारच्या धडकेत तीन जखमी
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ २६ रोजी दुपारी दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद प्रकाश खरे (वय ३४, रा. पुणे/बेरळ) हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या हुंडाई आय २० कार (एम.एच. १४ एल.ई. ०२६१) मधून पुणेहून खेडकडे प्रवास करत होते. कशेडी बोगद्याजवळ मुंबई-गोवा लेनचे काम सुरू असल्याने वाहतूक डायव्हर्जनमुळे गोवा-मुंबई लेनवर वळवण्यात आली होती.
यावेळी, गोवा-मुंबई लेनवरून खेडकडे जात असताना, त्यांच्या गाडीला समोरून भरधाव वेगात आलेल्या मारुती डिझायर (एम.एच.-२७ बी.झेड. १७१७) या गाडीने जोरदार धडक दिली. या गाडीचा चालक ज्ञानेश्वर भाउराव बालटकर (२४, रा. वालुर) असल्याचे समजते.
या अपघातात सौ. प्रिया प्रसाद खरे (वय २६), सौ. मनिषा प्रकाश खरे (वय ६१) आणि प्रकाश अनंत खरे (वय ६६, सर्व रा. बेरळ) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर, फिर्यादी प्रसाद खरे यांच्या आई सौ. मनिषा खरे यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी प्रसाद खरे यांनी खेड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बालटकर याच्याविरोधात निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात गाडी चालवून अपघात केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.