
रत्नागिरीत मटका खेळताना एकजण पोलिसांच्या ताब्यात
रोख रक्कम आणि साहित्य जप्त
रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलिसांनी २४ एप्रिल २०२५ रोजी नाचणे येथील मंगळवार आठवडा बाजारात छापा टाकून एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळताना ताब्यात घेतले. आरोपी केतन अशोक भोई (वय ४१, रा. गवळीवाडा, धनजीनाका, रत्नागिरी) याच्याकडून १ हजार २७० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल शरद शंकर जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाचणे येथील मंगळवार आठवडा बाजारातील बंद टपरीच्या पाठीमागे छापा टाकला.त्यावेळी आरोपी केतन भोई हा गैरकायदेशीरपणे आणि विनापरवाना मुंबई मटका जुगार पैशांवर खेळवत असताना मिळून आला.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६५/२०२५, महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात रात्री ९.५७ वाजता झाली.