पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत मुस्लिम समाज आक्रमक; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा
रत्नागिरी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरीतील मुस्लिम समाजाने तीव्र भावना व्यक्त केल्या. या जघन्य घटनेच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने मारुती मंदिर परिसरात हाताला काळ्या फिती बांधून निषेध प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी निषेधकर्त्यांनी दहशतवाद्यांविरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुस्लिम समाजाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, दहशतवाद्यांना कठोर शासन करण्याची मागणी केली.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या निषेध प्रदर्शनात समाजातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.