
आंबडसच्या तरुणाचा पैसे उकळण्याचा नवा फंडा
खेड
तालुक्यातील आंबडस येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाने पैसे उकळण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. हापूस आंबे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत गुगल पे द्वारे रक्कम स्वीकारुन हापूस आंबे न दिल्याने अनेकांची त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणुकीतील एका ग्राहकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचे समजते.
हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने मुंबई व पुणेस्थित चाकरमान्यांना हापूसची चव चाखण्याचा मोह आवरत नाही. आंबडस येथील एका तरुणाने नेमके हेच हेरत पैसे उकळण्याची नवी शक्कल शोधली. सोशल मिडीयावर एसएमएस टाकून स्वस्तातील आंबे घरपोच मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांकडून ३ हजारपासून १० ते १५ हजारपर्यंत रक्कम स्वीकारल्याचे समोर आले आहे.
तरुणाच्या गुगल पेवर अनेकांनी रक्कमही पाठवली. मात्र ग्राहकांना अद्याप हापूस आंबे पोहचलेले नाहीत. अनेक ग्राहकांनी त्याचे घर देखील गाठले, मात्र तो घरी सापडत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.