कंत्राटदार कंपनीच्या आठ डंपरवर कारवाई
संगमेश्वर, : राष्ट्रीय महामार्गाचे आरवली ते बावनदीदरम्यान काम करणाऱ्या कंपनीवर अनियमितता असताना यापूर्वी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली गेली नव्हती; मात्र आता भरधाव वाहतूक, डंपरची दूरवस्था, नंबरप्लेटशिवाय फिरणाऱ्या गाड्या, ओव्हरलोड वाहतूक आणि संगमेश्वर बसस्थानकासमोर सर्व्हिस रोड न करताच चौपदरीकरणाचे काम सुरू केल्याने पोलिस उपअधीक्षक शिवकुमार पारवे यांनी म्हात्रे कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एकूण आठ डंपरवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे; मात्र हे काम सुरू करत असताना मात्र म्हात्रे कंपनीचे डंपरचालक वाहतूक नियमांचे पालन न करता काम करत असल्याचे संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या लक्षात आल्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी त्या डंपरवर गुरुवारी कारवाई केली आहे.