
चिपळुणात रत्नागिरी उत्पादन शुल्कविभागाची मोठी कारवाई ; गोवा बनावटीचा लाखो रुपयांच्या दारूचा साठा जप्त
चिपळूण: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथे मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या सुमारे २१ लाख ६६ हजार रुपयांच्या दारूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई काल, दिनांक २२/०४/२०२५ रोजी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) श्री. प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त श्री. विजय चिंचाळकर आणि रत्नागिरीच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने आंबतखोल येथील जंगल भागातील बंद पडलेल्या सुखकर्ता उद्योग नामक कंपनीच्या एका कुलूपबंद पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.
या छाप्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली एकूण ३०० बॉक्स (२८४५.३२ बल्क लिटर) विदेशी दारू आढळून आली, ज्याची किंमत २१ लाख ६६ हजार रुपये आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा क्रमांक १०९/२०२५ दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमित शिवाजी भंडारी (रा. आगवे वरची वाडी, ता. चिपळूण) आणि जागा मालक सचिन यशवंत पाणिंद्रे (रा. निवळी, ता. चिपळूण) या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३, ९० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे आणि उपअधीक्षक श्री. हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री. अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक श्री. गणेश जाधव, दुय्यम निरीक्षक श्री. सचिन यादव, जवान श्री. मानस पवार, जवान श्री. वैभव सोनावले, जवान तथा वाहनचालक श्री. मलिक धोत्रे आणि मदतनीस श्री. महेश पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री, परराज्यातील अवैध दारूची वाहतूक व साठा, बनावट ताडी विक्री इत्यादी प्रकारची अवैध कृत्ये निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ आणि टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांनी केले आहे. अवैध दारू संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. अमित पाडळकर करत आहेत.