खेडची ‘एव्हरेस्टवीर’! प्रज्ञा शेट यांचे अद्वितीय यश – एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि काला पत्थर सर करताना दाखवली अपार जिद्द
खेड – खेडची सुपुत्री प्रज्ञा शेट हिने एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मी.) आणि काला पत्थर (५,५४५ मी.) यासारखे अत्यंत कठीण ट्रेक पूर्ण करत खेडचे नाव उज्ज्वल केले आहे. ती ही मोहिम पूर्ण करणारी खेड गावातील पहिली महिला ठरली आहे.
विशेष म्हणजे, या अत्यंत कठीण मोहिमेत प्रज्ञा यांच्यासोबत त्यांचे पती समीर शेट (पुणे) आणि फक्त १० वर्षांचा मुलगा रुद्रांश शेट यांनीही भाग घेतला. रुद्रांश हा न्यू जर्सी (अमेरिका) येथून एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान मुलगा ठरला आहे.
७ एप्रिल २०२५ रोजी हे त्रिकुट काठमांडूला दाखल झाले. ८ एप्रिलपासून ट्रेकची तयारी सुरू झाली. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे रामेछापहून लुक्ला एअरपोर्टकडे जाणारी फ्लाईट रद्द झाली. यामुळे त्यांनी १७ तासांचा थकवणारा प्रवास करून सुरेके या गावातून ट्रेकला सुरुवात केली.
प्रचंड पावसाचा मारा, हिमवृष्टी, हिमवादळ – या सगळ्याचा सामना करत त्यांनी धाडस, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला.

फाकदिंग, नाम्चे बाजार, डिंगबोचे, लाबुचे, गोरकशेप अशी उंचीवरची गावं पार करत त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठलं. मार्गात प्रचंड पाऊस, हिमवृष्टी, हिमवादळ यांचा सामना करत, अत्यंत कमी सराव असूनही, या कुटुंबाने जिद्द, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ही धैर्यगाथा लिहिली.
प्रज्ञा शेट ह्यांचे हे यश म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी आणि कुटुंबासाठी प्रेरणादायक उदाहरण आहे.