दागिने चोरीप्रकरणी दोघांना २ दिवस पोलीस कोठडीत
खेड : तालुक्यातील आंबडस येथील ग्रीनव्हिला फार्महाऊसमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या सिद्धेश एकनाथ उतेकर (२७, कुरवळजावळी-आखाडवाडी), रचना राजेंद्र भोसले (३२, मूळ गाव चोरवणे-गडकरवाडी) यांना पुन्हा मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने पुन्हा २ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीच्या खिडकीची स्लायडींगची काच सरकवत आतमध्ये बॅगेत ठेवलेले १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या बाबत संतोष शितोळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. चोरीच्या दागिन्यांचे नेमके काय केले, याची अजूनही अटकेतील दोघांनी पोलिसांना कबुली दिलेली नाही. पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या राहत्या घराचीही झडती घेतली असता हाती काहीच लागले नाही. यामुळे पोलीसही पेचात पडले आहेत.