उन्हाच्या तीव्र झळांनी रत्नागिरीकर हैराण
दुपारी रस्ते, बाजारपेठा ओस
रत्नागिरी
उन्हाच्या तीव्र झळांनी रत्नागिरीकर अक्षरशः हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत तर अतिउष्णतेमुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. परिणामी, पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्यामुळे, रस्ते, बाजारपेठा ओस पडल्या आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाणे आणि कोकण पट्यात उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.