रत्नागिरीत गांजा विक्री करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक; १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गांजा विक्री करणाऱ्या एका रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरजोळे येथील नाचणकर चाळीच्या मागील रस्त्यावर 3 एप्रिल रोजी सायंकाळी 4.50 वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मण रवी नायर (वय ३४, रा. नाचणकर चाळ, मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद गणेश राजेंद्र सावंत (पोहवा. ३०६, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान संशयिताकडे २०,००० रुपये किमतीचा ०.४७७ ग्रॅम गांजा, १,५०,००० रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा (एमएच-०८-एक्य-१६६५) असा एकूण 1 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मण नायर हा रिक्षातून गांजा विक्री करत होता. मिरजोळे येथील नाचणकर चाळीच्या मागील रस्त्यावर तो गांजा विक्रीसाठी थांबला असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या रिक्षातून गांजा आणि रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.