
रत्नागिरीतील योगेश हळदवणेकर यांच्या पॅनकार्ड, आधार कार्डचा गैरवापर
आयकर विभागाकडून हळदवणेकर यांना तब्बल १७८ कोटी रुपयांच्या व्यवहारांप्रकरणी नोटीस
रत्नागिरी : रत्नागिरीत खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. शहरातील योगेश हळदवणेकर यांच्या आधार कार्ड, पॅनकार्डचा गैरवापर करून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दोन कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या बोगस कंपन्यांनी हळदवणेकर यांच्या कागदपत्रांचा वापर केल्याने त्यांना 178 कोटीच्या व्यवहार प्रकरणी आयकर विभागाची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकाराने रत्नागिरीत खळबळ उडाली असून हळदवणेकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
आयकर विभागाने धाडलेल्या नोटिसमध्ये म्हंटले आहे, हळदवणेकर यांच्या नावावर दिल्ली आणि उत्तरप्रदेश येथे दोन कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या दोन कंपन्यांमधून १७८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हे व्यवहार कोणत्या कारणासाठी झाले आणि का या व्यवहाराची माहिती द्यावी असे आयकर विभागाने हळदवणेकर यांना बजावलेल्या नोटीसित म्हंटले आहे. नोटीस हातात पडल्यानंतर हळदवणेकर यांच्या पायाखालची वाळू सरकली असून आपण एक सर्वसामान्य माणूस असून एवढी मोठी रक्कम आपल्या कशी दाखवण्यात आली याने भांबावलेल्या हळदवणेकर यांची स्थिती ‘करून गेलं गाव आणि हळदवणेकरच नाव’ अशी झाली आहे. आयकर विभागाने हळदवणेकर यांना ३१ मार्च पर्यंत या व्यवहारांचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हळदवणेकर यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या पॅन आणि आधार कार्डाचा कोणीतरी गैरवापर केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची हळदवणेकर आता रीतसर पोलिस तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र शहरात अशा प्रकारच्या आणखी दोघांना नोटिसा आल्याचे समोर आले आहे