
कारवांचीवाडी येथे कार- एसटी अपघात अपघातात एकाचा मृत्यू
रत्नागिरी: कारवांचीवाडी येथील मुख्य रस्त्यावर मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार आणि एसटीचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला तर फायनान्स कंपनीचा युनिट मॅनेजर या अपघातात ठार झाला.
विकास नौसर (वय ३४, रा. मुंबई) असे मृत युनिट मॅनेजरचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वस्ती फायनान्स या मायक्रो फायनान्स कंपनीचे युनिट मॅनेजर सह चार कर्मचारी कार (क्र. एमएच-०४ एलएच १६७८) मधून बुधवारी (ता. २) मध्यरात्री १२ वाजता मुंबई- चेंबुर येथून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी सकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बैठकीला उपस्थित राहणार होते. कारवांचीवाडी येथील रस्त्यावरील डायव्हर्शन न कळल्यामुळे समोरुन येणाऱ्या एसटी व कारची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला तर एक किरकोळ जखमी झाला. उपचारासाठी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र युनिट मॅनेजर विकास नौसर हा गाडीत चालकाच्या मागील सीटवर बसला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघातात किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान विकासच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककाळा पसरली आहे.
ग्रामीण पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्त कार आणि बसची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार कारवांचीवाडी येथील रस्त्यावर असलेले डायव्हर्जन गाडी चालकाच्या लक्षात आले नाही. ज्यामुळे ही समोरासमोर टक्कर झाली. गाडीतील इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील बदललेल्या मार्गामुळे हा अपघात घडला. ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.