संकेतस्थळ बनवणारी खरवते राजापुरातील पहिली ग्रामपंचायत
राजापूर :
राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने खरवते गावचे स्वतःचे संकेतस्थळ तयार केले आहे. राज्यभर राबवण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमां’तर्गंत स्वतःचे संकेतस्थळ बनवणारी खरवते ग्रामपंचायत राजापुरातील पहिली आणि जैविविधततेचे संकेतस्थळ विकसित करणारी दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे.
या संकेतस्थळाचे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्याहस्ते उद्घाटन झाले. खरवते येथे झालेल्या या कार्यक्रमाच्यावेळी गटविकास अधिकारी नीलेश जगताप, खरवतेचे सरपंच अभय चौगुले, उपसरंपच गौरव सोरप, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, भरत लाड, संकेतस्थळ विकसित करणारे हर्षद तुळपुळे, यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ, शिक्षकवृंद उपस्थित होते.
या संकेतस्थळावर गावातील मंदीरे व श्रद्धास्थाने, ग्रामपंचायत कामकाज, गावातील उद्योग-व्यवसाय, गावातील शैक्षणिक सुविधा, विकासकामे, ऐतिहासिक वारसास्थळे, जलव्यवस्थापन, जैवविविधता, माझी वसुंधरा अभियानाची माहिती आदी फोटोसहित प्रकाशित करण्यात आली आहे. गावच्या विविधांगी माहितीसंबंधित व्हिडीओही प्रसारित करण्यात आले आहेत.