निगडेनजीक मोटार जळून खाक
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील निगडेनजीक गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास दापोली तालुक्यातील मुरूड येथून कवठेमहांकाळ येथे जाणारी मोटार जळून भस्मसात झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने त्याच्यासह अन्य दोघे जण बालंबाल बचावले.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. चालक शुभम बापूसाहेब साबळे (वय २९, रा. कवठेमहांकाळ, सांगली) हे मोटारीतून (एमएच १० एजी २०६६) आकाश जगन्नाथ शिंदे, रेश्मा प्रकाश शिंदे (दोघेही रा. मुरूड-दापोली) यांना घेऊन मुरूड येथून कवठेमहांकाळ येथे जात होते. भोस्ते घाट चढून कार निगडेनजीक आली असता मोटारीच्या इंजिनमधून धूर आला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने मोटार रस्त्यालगत थांबवत दोघांनाही बाहेर पडण्यास सांगितले. मोटारीतील साहित्यही बाहेर काढले. काही क्षणातच आगीचा भडका उडून मोटार जळून भस्मसात झाली.