दापोली चोरीप्रकरणी संशयितास मुंबईत अटक
दापोली : तालुक्यातील करंजाळी येथील घरातून कोणी नसल्याचा फायदा घेत कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या एका तरुणास दापोली पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुंबई नागपाडा येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास करंजाळी येथून संशयित सुनिल मोहन मोरे वय ४२ रा. वसई याने फिर्यादीचे राहात्या घरातील बेडरुममध्ये किचनच्या भिंतीवरून प्रवेश करून बेडरुममध्ये कोणीही नसल्याचे फायदा घेत कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. संशयिताचा दापोली पोलीस शोध घेत असताना त्यांना त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई येथे असल्याचे निदर्शनास आले. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुहास पाटील, विजय सातर्डेकर यांनी लागलीच मुंबई येथे जाऊन संशयित आरोपीचा शिताफीने शोध घेत त्याला नागपाडा येथून ताब्यात घेतले, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केल्याने त्याला रविवार दि. २३ मार्च रोजी दापोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संशयित सुनिल मोरे याच्यावर दापोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर ५२/२०२५ भारतीय न्यायसंहिता २२३ची कलम ३०६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला माल दापोली पोलिसांनी जप्तकरून संशयित सुनिल मोरे यांना सोमवार दि. २४ मार्च रोजी दापोली न्यायालयात हजर केले.