
सव्वालाखाचे दागिने रेल्वे प्रतीक्षालयातून लंपास
संगमेश्वर : दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाने संगमेश्वर रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालयात ठेवलेल्या बॅगमधून १ लाख ३० हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अन्विता अविनाश पवार (२८, सध्या रा. दिवा) या दिवा धामापूरवाडी येथून दिवा तेः रत्नागिरी पॅसेंजरने संगमेश्वरला आल्या. संगमेश्वरला उतरल्यानंतर त्या रेल्वे स्टेशन येथील प्रतीक्षालयात बसल्या होत्या. २३ मार्च रोजी पहाटे ४ ते ६ च्या दरम्यान प्रतीक्षालयातील बाकड्याच्या खाली पिशवीमध्ये ७५ हजार रुपयांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५० हजार रुपयांचे सोन्याचा हार आणि १ ग्रॅम वजनाचे ५ हजार रुपयाचे सोन्याचे पान असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात इसमाने चोरून नेला.
…………
भोस्तेत तिहेरी अपघात, टैंकर चालकावर गुन्हा
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर झालेल्या तिहेरी अपघातात कारमधील प्रवाशांच्या किरकोळ दुखापतींसह अन्य तीन वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालक राजेश्वर शनप्पा मंगलगी (२६रा. विजापूर, कर्नाटक) याच्यावर रविवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
टैंकर घेऊन तो भोस्ते घाट उतरत असताना ट्रकला धडक दिली. या धडकेनंतर ट्रक थेट दरीत कोसळला. मागून येणारी इर्टिगा कार व कंटेनर एकमेकांवर आदळल्याने तिहेरी विचित्र अपघात घडला होता. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक देखील ठप्प झाली होती.