
कळंबणीनजीक रेल्वेच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू
खेड : कोकण रेल्वे मार्गावर कळंबणी रेल्वेस्थानकानजीक मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाडीची धडक बसून वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. वृद्धाची ओळख पटलेली नाही. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ६५ ते ७० वयोगटातील वृद्धाचा मृतदेह कळंबणी रेल्वेरुळानजीक गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. रेल्वेगाडीची धडक बसल्याने शरीराचे दोन तुकडे झाले होते. या बाबत पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेल्या मृताची ओळख पटवणे अशक्य झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.