दापोलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाचजण जखमी
दापोली : तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये विशेष करून लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे.
ग्रामीण भागांमध्ये दोन दिवसात ५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. यामध्ये माटवण, आसूद, हर्णे, नारगोली, चिखलगाव येथील पाच जखमींनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. शिवाय पुणे येथून आलेल्या लहान मुलाचाही कुंत्र्याने चावा घेतल्याचे समोर आले आहे. शहरासह ग्रामीण भागांमधील गावांमध्ये व समुद्रकिनाऱ्यांवर भटके कुत्रे वावरताना दिसत आहेत. त्यांचे हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.