मुरुड येथील ‘त्या’ बोट मालकावर होणार कारवाई
दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी डॉल्फिन सफरीसाठी गेलेली बोट परत किनारी येत असताना वेगवान वाऱ्यामुळे व पाण्याच्या प्रवाहामुळे उलटून झालेल्या अपघातप्रकरणी अनधिकृत बोट चालक, मालकांची बंदर विभागाकडून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
१६ मार्च रोजी मुरुड समुद्रकिनारी अनधिकृतरित्या वॉटर स्पोर्टस् व्यवसाय करणारी एक नौका क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना घेऊन गेली असताना समुद्रात उलटली. स्थानिकांच्या मदतीने बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यात आले. त्यातच ही बोट अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या घटनेची बंदर विभागाकडून चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे बंदर निरीक्षक रामदास गवार यांनी सांगितले.