
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कार नाल्यात कोसळली
पाच विद्यार्थी थोडक्यात बचावले, स्टेअरिंग लॉक झाल्याने घडला प्रकार
चिपळूण:
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या नाल्यात कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास कोकण आंगण चौक परिसरात घडली. या कारमध्ये पाच विद्यार्थी होते. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ स्वरुपाची दुखापत. झाली. कारचे स्टेअरिंग अचानकपणे लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, या अपघाताची चिपळूण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.
शनिवारी ६.१५ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कार पवन तलावामागील बाजूस असणाऱ्या रस्त्यावरून जात असताना ती कोकण आंगण चौक परिसरात आली असता रस्त्यालगतच असलेल्या नाल्यात कोसळली. रस्त्यावरुन ये-जा करत असलेल्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनात येताच त्यांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. पहिल्यांदा कारमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. विद्यार्थी किरकोळ स्वरुपात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
पवन तलावामागील कोकण आंगण चौक ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यालगत असलेला नाला लक्षात घेता येथे संरक्षण भिंत किंवा रेलिंग उभारावे यासाठी मागणी केली होती. मात्र हे काम आजही पूर्णत्वास गेलेले नाही. सुरक्षितेतच्या दृष्टीने नगर परिषदेने नाल्याच्या बाजूने संरक्षक भिंत किंवा रेलिंग उभारावे, अशी मागणी माजी नगरसेविका रसिका देवळेकर यांनी केली आहे