
जिल्ह्यात खेड तालुक्यातून पाण्यासाठीचा पहिला अर्ज
रत्नागिरी
खेड तालुक्यातील चिरणी- धनगरवाडी येथील विहीर आटल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. खेड पंचायत समितीकडे तालुक्यातील टँकरच्या पाण्यासाठीचा पहिला अर्ज दाखल झाला आहे.
तालुक्यातील देवसडेतील 2 वाड्यांमध्ये तालुक्यातील पहिला टँकर धावण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र चिरणी-धनगरवाडीची भर पडली आहे. गतवर्षी तालुक्यात 8 एप्रिलपासून देसवडेतील वाड्यांमध्ये पाण्याचा पहिला टँकर धावला होता. गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढला आहे. उपलब्ध जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातच पाण्याचा टँकर धावेल, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आता चिरणी-धनगरवाडीतील ग्रामस्थांनी टँकरने पिण्याच्या पाण्याची मागणी करणारा पहिला अर्ज दाखल केला आहे.