
आयात-निर्यात क्षेत्रात कोकण रेल्वेचे रत्नागिरीसाठी महत्त्वाचे पाऊल
थेट जेएनपीटी बंदरात जाणार रत्नागिरीतील उत्पादने : स्वतंत्र यंत्रणा सज्ज
रत्नागिरी : आयात आणि निर्यात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.आता रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात येथील उत्पादने पाठवता येणार आहे. गद्रे मरीन एक्सपोर्टचे पहिले २० पूर्णतः वातानुकूलित मिनी कंटेनर रेक रत्नागिरी स्थानकातून रवाना करण्यात आले आहेत. यासाठी कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे.*
रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्पादने जगाच्या पाठीवर विविध देशात पाठवली जातात तशीच विविध उत्पादने येथे आयात ही होतात. यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेकमधून जिल्ह्यातील उत्पादने निर्यातीसाठी पाठवली जात होती; पण आता कोकण रेल्वेने या विषयात मोठे पाऊल उचलत रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतुकीची यंत्रणा उभी केली आहे. यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात रवाना होणार आहे.
एसगद्रे मरीन एक्सपोर्टचे पहिले २० पूर्णतः वातानुकूलित मिनी कंटेनर रेक रत्नागिरीतून रवाना करण्यात आले. यावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, गद्रे मरीन एक्सपोर्टचे संचालक अर्जुन गद्रे, कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेकडून स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोकणातील आयात व निर्यातदारांना यामुळे गोव्यातून उपलब्ध होणाऱ्या रेकवर अवलंबून रहावे लागणार नाही आहे. कोकणातील मत्स्य आणि फळ प्रक्रिया उद्योगांकरिता हि मोठी सुविधा कोकण रेल्वे ने उपलब्ध करून दिली आहे.
आयात व निर्यातदारांसाठी परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्न करीत आहे.कोकणातील आयात निर्यातदारांनी कोकण रेल्वेच्या या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले आहे.