
अर्जुना धरणात बुडून मृत्यू प्रौढाचा मृत्यू
राजापूर:- पाचल कोंडवाडी येथील सीताराम भगवान चौगुले (वय ५५) यांचा पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सीताराम चौगुले हे शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता सदर घटना घडली.
पाचल कोंडवाडीतील राहिवाशी सीताराम भगवान चौगुले हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेळ्या चरण्यासाठी रानात घेऊन गेले होते. त्या परीसरातून अर्जुना धरणाचा उजवा कळवा पुढे हरळकडे जातो. कालव्यात पाणी सोडण्यात आले असल्याने बऱ्यापैकी पाणीसाठा कालव्यात देखील आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे शेळ्या घेऊन घरी परत येत असताना सीताराम चौगुले हे पाय घसरून अचानक कालव्यात पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला.
दरम्यान, सीताराम चौगुले घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्या परीसरात जावून शोध घेतला होता. आज बुधवारी कालव्यावरील बोगदयाच्या जाळीत त्याचा मृतदेह आढळून आला. या बाबत रायपाटण पोलीस दूरक्षेत्रासह राजापूर पोलीस ठाण्याला झालेल्या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. सीताराम चौगुले यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.