
स्पेशल एक्स्प्रेसमधून सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने पळवले
खेड: कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव- नागपूर स्पेशल एक्स्प्रेस रेल्वेत ३० वर्षीय विवाहित महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लांबवले. या मंगळसूत्राची किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपये इतकी आहे. रविवारी पहाटे खेड स्थानकादरम्यान ही घटना घडली.
याबाबत रूपाली पांडुरंग चाचे (रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी खेड पोलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार त्या मडगाव-नागपूर स्पेशल एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतून प्रवास करत होत्या. ही गाडी खेड तालुक्यातील कळंबणी सिग्नलजवळ थांबली असता एका चोरट्याने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन गळ्यातील १ लाख ३३ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर गाडीच्या दरवाजातून उडी मारून चोरटा पळून गेला.