
करजुवे येथे बेकायदा वाळू उत्खनन
चिपळूण : वाळू उत्खनन बंदी असताना शहरातील मुख्य रस्त्यावर व अंतर्गत मार्गावर जागोजागी वाळूचे साठे केलेले पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे बेकायदा उत्खनन सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
चिवेली येथेही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असून, ही वाळू थेट खेडमधील पलांजेत उतरवली जात आहे. अनधिकृत वाळू व्यवसायामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाही उत्खननाला परवानगी का दिली जात नाही, असा सवाल वाळू व्यावसायिकांसह सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. महसूलने वाळूचे माहेरघर असलेल्या गोवळकोट व कालुस्ते येथे बेकायदा वाळू उत्खनन होऊ नये म्हणून पथके तैनात ठेवली आहेत. त्यामुळे येथील उत्खनन पूर्णपणे थांबले असले, तरी त्याचा फायदा खाडीपट्ट्यातील मालदोली, गांग्रई, चिवेलीतील काही व्यावसायिक घेत होते.
या गावांमध्ये दिवस-रात्र वाळू व्यवसाय सुरू होता. मात्र आता, महसूलने येथेही लक्ष घातल्याने केवळ चिवेली येथे उत्खनन सुरू असून वाळूच्या दररोज 7 ते 8 बोटी वाळू घेऊन थेट पलांजेत जाऊन उतरवत आहेत. दुसरीकडे संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथून दररोज वाळूच्या अनेक गाड्या येथे येत असल्याने शहरात वाळूचे ढिगारे दिसत आहेत.
जिल्हा खनिकर्म अधिकार्यांकडून धडक कारवाई
गेल्या काही वर्षांपासून ड्रेझर, हातपाटीने होणार्या वाळू उत्खननाला बंदी आहे. असे असताना मध्यंतरी काही राजकारण्यांचा आशीर्वाद व महसूलचे दुर्लक्ष यामुळे येथे सक्शन पंपासह हातपाटीचा व्यवसाय जोरदार सुरू होता. त्यातून तक्रारी झाल्याने काही महिन्यांपूर्वी जिल्हा खनिकर्म अधिकार्यांनी येथे येऊन पंप फोडण्यापर्यंतची धडक कारवाई केली.