
डोंगरी निधी शैक्षणिक विभागासाठी वापरा
डॉ. विनय नातू ः अडीच तालुक्यांना उपयोग
गुहागर: शासनाने गेल्या वर्षी डोंगरी विकास शासननिर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीन तालुक्यांपैकी अडीच तालुक्यांना या निर्णयाचा उपयोग होत आहे. त्यामुळे डोंगरीचा विकासनिधी सार्वजनिक विकासाकरिता मिळत आहे तसाच उपयोग शैक्षणिक कामकाजाकरिता व्हावा व तसा प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधील ज्या साडेतीन तालुक्यांना डोंगरी भागाचा फायदा मिळत नव्हता; मात्र शासननिर्णयामुळे जिल्ह्यातील साडेतीन तालुक्यांमधील अडीच तालुक्यांना या निर्णयाचा उपयोग होत असल्याबद्दल नातू यांनी शासननिर्णयाचे सर्वप्रथम स्वागत केले. निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील या साडेतीन तालुक्यांमध्ये शिक्षकमान्य संख्येकरिता पटसंख्येची अट, तुकडी मान्यतेकरिता पटसंख्येची अट यासारख्या अनेक शैक्षणिकदृष्ट्या उपयोगी गोष्टी तसेच डोंगरी भागातील विद्यार्थी म्हणून मिळणारे आरक्षण यामध्येही सहभाग झाल्यास डोंगरी भागामुळे जसा सार्वजनिक विकासाकरिता निधी मिळत आहे तसाच उपयोग शैक्षणिक कामकाजाकरिता होईल व त्यामुळे अनेक विद्यार्थी यांची शैक्षणिक गैरसोय दूर होईल. या सर्व बाबींचा विचार करून शासननिर्णयाची अंमलबजावणी शिक्षण विभागाकरिता करण्याबाबत प्रस्ताव तयार करून मान्यता द्यावी, अशी मागणीही नातू यांनी केली आहे.
—