
मोबाईलच्या सीडीआरवरुन उघड होणार गांजा ‘कनेक्शन’
खेड: खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खोपी-रघुवीर फाटा येथे गांजा वाहतूक करताना तिघांच्या मुसक्या आवळल्यानंतर महिलेसह तिघांच्याही जप्त केलेल्या मोबाईलचे सीडीआर तपासणीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आले आहेत. यांतून.नेमक्या ‘कनेक्शन’चा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
दोन स्थानिक फरार संशयितांचाही कसून शोध घेण्यात येत आहे. तिघांनाही शुक्रवारी न्यायालयांसमोर हजर करण्यात आले असता पुन्हा २ दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
लक्ष्मण कुंदन भोरे (४०), उज्ज्वला बाळकृष्ण मेकले (३६, दोघे रा. माझगावकर माळ झोपडपट्टी, सातारा), अविनाश हरिश्चंद्र मोरे (४५, उचाट-महाबळेश्वर) यांच्या गांजा वाहतूक करताना स्कॉर्पिओ व्हॅन व दुचाकीसह येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आणखी कारनामे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कंबर कसली आहे. या प्रकरणात दोन स्थानिकांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून दोघेही पसार आहेत.
येथील पोलिसांचे पथक दोघांच्याही मागावर आहेत. त्यांच्या अटकेनंतरही तपासाला आणखी गती मिळून अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटकेतील तिघांचेही मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. तीनही मोबाईलचे सीडीआर तपासणीसाठी रत्नागिरी येथे पाठवण्यात आले आहेत.