
बालविज्ञान केंद्रात साकारला कोकणातील पहिला ‘विज्ञान बगीचा’
रत्नागिरी : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर या बालविज्ञान केंद्रात कोकणातील पहिला ‘विज्ञान बगीचा’ उभारला आहे. या बगीच्याचे उद्घाटन उद्योगपती राम भोगले यांचे हस्ते नुकतेच झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान प्रसारक सुरेंद्र वैद्य उपस्थित होते. यावेळी पाध्ये इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका खंडागळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. विज्ञान केंद्राचे संस्थापक व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी सांगितले की, संस्थेने विद्यार्थ्यांच्या विज्ञान विकासासाठी टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. लहान मुलांना खेळ खेळण्याबरोबरच विज्ञान देखील हसत खेळत कळावे हा या विज्ञान बगीचाचा मुख्य उद्देश आहे.
आठ गुंठे जागेमध्ये उभारलेल्या या बगीच्यामध्ये 18 वैज्ञानिक खेळणी आहेत ज्यामध्ये घसरगुंड्या, झोपाळे, तराफा, कप्पी आदि यांत्रिकी विज्ञान समजावणारी खेळणी आहेत. त्याचबरोबर ध्वनी, प्रकाश, दृष्टी आदी मागचे विज्ञान सांगणारीही खेळणी आहेत. या बगीच्यातील प्रत्येक खेळण्याच्या बाजूला त्या खेळण्यामागचे विज्ञान स्पष्ट करणारा फलक बसविलेला आहे. सृजन सायन्स सेंटरमध्ये उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता विज्ञानाचे अनेक प्रयोग मांडण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन विज्ञान केंद्राचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी केले तर संस्थेचे कार्यवाह शिरीष फाटक यांनी आभार प्रदर्शन केले.