
आंबा बागेत कामासाठी असलेल्या नेपाळ्याने मोबाईल चोरला
रत्नागिरी ः आंबा बागेच्या कामासाठी आलेल्या नेपाळ्याने २४ हजाराचा मोबाईल पळविला. राजापूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक चौधरी (वय ३०, रा. अहमदाला मोहनथाल जि. कैलाली नेपाळ. सध्या रा. खिनगीनी गावी, ता. राजापूर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) रात्री अडीचच्या सुमारास खिनगीनी गावी फिर्यादी यांच्या घरी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विशाल विजय सरफरे (वय ३५, रा. सरफरेवाडी, ता. राजापूर, रत्नागिरी) यांच्या आबा बागेत कामासाठी संशयित नेपाळी विवेक चौधरी होता. त्याने सरफरे यांचा २४ हजाराचा मोबाईल पळविला. या प्रकरणी त्यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.