
राज्यस्तरीय कला भूषण पुरस्काराने प्रकाश सावंत सन्मानित
रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील विश्वसमता कलामंच लोवलेचे राज्यस्तरीय पुरस्कार रविवारी (दिनांक ९ फेब्रुवारी २०२५) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात रत्नागिरी तालुक्यातील चरवेली गावचे तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश सावंत यांना राज्यस्तरीय विश्वसमता कलामंच कला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संगमेश्वर येथील लोवले येथील शुभगंधा सभागृहात दि.९ रोजी रविवारी हा पुरस्कार सन्मानाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम कलामंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपादिका-संस्थापिका भावना खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, लोवले गावच्या सरपंच ऋतुजा कदम, राजेंद्र मोहिते, प्रदिप शिंदे, बावा चव्हाण प्रतिष्ठानचे श्री. चव्हाण, श्री. भोसले यांसह राज्यातील अनेक मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी मनोज जाधव म्हणाले, जे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात त्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा व उर्जा मिळावी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. आज पर्यंत अनेकांच्या कार्याचा दखल आम्ही घेत आलो आहोत.
प्रकाश सावंत हे शिल्पकार सेवा संघ बौद्धवाडीचे विद्यमान अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत चरवेली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष असून सद्या सामाजिक कामकाजही दोन्ही स्तरावर करीत आहे. सावंत हे १९८० पासून आजपर्यंत लोकसंगीत जलसा सामाजिक प्रबोधन कार्यक्रम करतात. शिवाय १९९० पासून ३४ वर्षात ३० नाटके सामाजिक विनोदी कौटुंबिक प्रकारची दिग्दर्शन करून वेगवेगळ्या भूमिका ही त्यांनी सादर केल्या आहेत. यापैकी शिल्पकार नाट्य मंडळ चरवेल येथे २४ नाटके व ६ नाटके बाहेर गावी केली आहेत. यंदा गावी २५ वे नाटक त्यांच्या दिग्दर्शनाने होणार आहे. त्यांनी “महाराष्ट्र समता प्रवर्तक संगीत जलसा मंडळ चरवेली” या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन , दारूबंदी, हुंडा बंदी, अनिष्ट रूढी-परंपरा बंदी, कौटुंबिक आशयाचे लिखाण स्वतः करून, स्वताच्या दिग्दर्शनाचे वग नाटीकांचे सादरीकरण केले आहे. प्रकाश सावंत यांचा आवाज ही पहाडी आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सावंत यांचे जिल्हातुन अभिनंदन होत आहे.