
कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यातील वाहतुकीसाठी १५ दिवसांची प्रतिक्षा
खेड:
मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांतील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त हुकल्याने साऱ्याचा हिरमोड झाला आहे. दुसऱ्या बोगद्यात १० पंखे बसवण्यात येणार आहेत. यातील ४ पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंखे बसवण्याच्या कामासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही कामे झाल्यानंतर ‘ट्रायल’ घेतल्यानंतरच दुसऱ्या बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सांगण्यात आले.
कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक खुली झाल्यानंतर वाहनालकांचा प्रवास सुसाट अन् आरामदायी झाला होता. वाहनालकांनी बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती दिली. पहिल्या बोगद्यापाठोपाठ दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला झालेला असताना येथेही अडथळयाचे ‘ग्रहण’ सुरू झाले.
दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा घेण्यासाठी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची सबब राष्ट्रीय महामार्ग खात्याने पुढे केली. सद्यस्थितीत एका बोगद्यातील दोन्ही बाजुकडील वाहतूक सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यातील पंखे बसवण्यासह अन्य प्रलंबित कामे मार्गी लावून प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर दुसऱ्या बोगद्यातूनही पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ही डेडलाईनही हुकली आहे. सध्यस्थितीत चार ठिकाणी पंखे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. अन्य ६ ठिकाणी पंखे बसवण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर बोगद्यातून चाचणी घेतली जाणार असून या नंतरच पूर्ण क्षमतेने दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू होणार आहे.