
परभणीतील सहलीच्या बसला डिंगणी – फुणगुस येथे वॅगनारची धडक
वॅगनार चालकावर गुन्हा
संगमेश्वर : परभणी येथून मुलांना घेउन शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या बसला डिंगणी फुणगुस मार्गावर वॅगनार कारने विरूध्द दिशेला जावून धडक दिली. या धडकेत बसचे नुकसान झाले. याप्रकरणी ठाणे येथील बॅगनार चालकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्देश रामा भोईर (३५, सापडगाव, ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद बस चालक सतीश मुरलीधरराव शेळके (३४, परभणी बस डेपो) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालक सतीश शेळके हे आपल्या ताब्यातील मुलांची शैक्षणिक सहल बस क्र. (एमएच १३, सीयु ७८२९) घेवून ३ फेब्रुवारी रोजी परभणीहून कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्हयातून देवदर्शन घेवून गणपतीपुळे येथे आले होते. गणपतीपुळे येथे ६ फेब्रुवारी रोजी दर्शन घेवून तेथेच मुक्काम केला. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी ही बस संगमेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास डिंगणी फुणगुस मार्गावर बस आली असता समोरून येणाऱ्या वॅगनार कार चालक सिध्देश याने विरूध्द दिशेला जावून सहलीच्या बसला जोरदार धडक दिली. यामध्ये बसचे नुकसान झाले. तसेच कारचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. या अपघात प्रकरणी बस चालक सतीश शेळके यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वॅगनार चालक सिध्देश भोईर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.