
आंगणेवाडी जत्रेसाठी दोन विशेष रेल्वे धावणार
रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा २२ फेब्रुवारी रोजी आहे. या जत्रेच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी विशेष गाड्याच्या दोन फेऱ्या जाहीर केल्या. या दोन्ही गाड्यांचे आरक्षण ९ रोजी खुले होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी विशेष गाडी २१ रोजी रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. १९ एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रेल्वे २२ फेब्रुवारी रोजी १२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी सकाळी १२ वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६.१० वाजता सावंतवाडी येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल. येथे २२ एलएचबी डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबणार आहे.