प्रेमप्रकरणातील संशयातून प्रेयसीसह भावाची तरुणाला मारहाण
रत्नागिरी:- दुसर्या मुलींना गाडीवरुन फिरवतो अशा संशयातून प्रेयसीसह तिच्या भावाने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवार 30 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वा. सुमारास कर्ला येथे घडली.
सलमान शबीर मुल्ला (रा. राजापूरकर कॉलन उद्यमनगर, रत्नागिरी) आणि त्याची बहीण (रा. कर्ला, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित भावंडांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात आफताब सादिक मुकादम (वय 25, रा. मिरकरवाडा पांजरी मोहल्ला, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्याचे बहिणीशी प्रेमसंबंध आहेत. परंतु, आफताब हा दुसर्या मुलांना गाडीवरुन फिरवतो, असा संशय घेउन संबंधित मुलगी त्याच्याशी वाद घालत होती.
यातूनच गुरुवारी दुपारी फिर्यादी आफताब त्याची आई व वहिनी हे सर्व मिळून या मुलीच्या कर्ला येथील घरी वाद मिटवण्यासाठी गेले होते. तेव्हा तिची मामी व मामीची मैत्रीण असे सर्वजण बोलत असताना तिचा भाऊ सलमान मुल्ला तिथे आला. त्या नंतर त्याने फिर्यादी आफताबला शिवीगाळ करत कानावर, डोक्यावर, पाटीवर व पोटात लाथाबुकक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा आफताबची आई आणि वहिनी त्याला सोडवण्यासाठी मधे पडल्या असता सलमानने हातातील गाडीच्या चावीने आफताबच्या कानावर,छातीवर व पाठीवर मारुन दुखापत केली.
दरम्यान, संबंधित मुलीनेही आफताबचे केस पकडून त्याचे डोके घरातील कपाटावर आपटून त्याचा गळा दाबत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम118(1), 115(2), 352, 351(2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.