
सन्मित्र नगर येथे तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण
रत्नागिरी
शहरातील बीएसएनएल ऑफीस जवळील शासकीय वस्तीगृह येथे काम करणाऱ्या तरुणाला तीन तरुणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच अन्य तिघांना मारण्याची धमकी दिली. तीन संशयित तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत कांबळे, प्रताप सुदाम कांबळे, शुभम पाडाळकर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी संशयित तरुणांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. २६) प्रजासत्ताकदिनी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास बीएसएनएल ऑफीस जवळील शासकीय वस्तीगृह, रुम नंबर ४ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रितेश मधुकर सोनवणे (वय २९, मु. रा. पोकुरंगीता, पाचोरा, जि. जळगाव सध्या रा. संभ्यकनगर, कारवांचीवाडी-रत्नागिरी) हे रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मुलांच्या शासकीय वस्तीगृह येथे वस्तीगृहाच्या रु नं ४ मध्ये काम करत असताना संशयित तिघांनी तेथे येऊन फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार केलीस तर देसाई मॅडमला तुझ्या विरोधात खोटी तक्रार करायला लावेन नाहीतर तुला मारुन टाकेन. आज जस तुला मारलय त्याची व्हिडिओ व्हायरल करु. तुझ्या प्रमाणे दिपक घाटे स्वप्नील आणि अमोलला मारणार अशी धमकी दिली. या हाणामारीत फिर्यादी रितेश सोनवणे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.