
देवरुख येथे ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
‘मनसे’ ची कुटुंबाला मदत
देवरुख : येथील मच्छिमार्केट येथे ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या वनिता तुकाराम झोरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा अपघात घडल्यापासून त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी मनसे धाऊन गेली आहे. देवरुख येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गोवा येथील गाडी मालकाकडून मनसे स्टाईलने झोरे कुटुंबाला तात्काळ मदत मिळवून दिली. याबद्दल झोरे कुटुंबाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
वनिता झोरे या चालत जात असताना देवरुख मच्छिमार्केट येथे ट्रॅकने त्यांना जोराची धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या पायांवरून ट्रक गेला. यामध्ये त्यांचा पाय निकामी झाला. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचे दु:खद निधन झाले. अपघात घडल्यापासून देवरूख येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोरे कुटुंबाला गाडी मालकाकडून मदत मिळवून देत या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.
या मदतीबद्दल झोरे कुटुंबांने मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे व देवरुख येथील मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष व माजी नगरसेवक श्री अनुराग कोचिरकर, मनसे देवरुख शहराध्यक्ष श्री सागर संसारे, मनविसे शहराध्यक्ष श्री ऋतुराज देवरुखकर, मनसे विभाग अध्यक्ष श्री अक्षय झेपले, सचिव तुषार बांडागळे, शाखाध्यक्ष श्री ओंकार विंचू, महाराष्ट्र सैनिक दिपक शिंदे आदी मदतीसाठी उपस्थित होते. या कामात देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. अतुल जाधव यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे मनसेने सांगितले.