
सोमेश्वर शांतिपीठ – विश्वमंगल गौशाळेला रावी इन्फ्रा कंपनीचे कुलदीप दीक्षित यांची भेट – प्रकल्पासाठी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
रत्नागिरी : रावी इन्फ्रा कंपनीचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट श्री कुलदीप दीक्षित यांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी विश्वमंगल गौशाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी गौशाळेतील प्रस्तावित प्रकल्प स्थळांची पाहणी केली आणि प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी गौशाळेच्या संस्थापिका सौ. अनुजा पेठकर, विश्वस्त श्री. रवींद्र इनामदार, विश्वस्त श्री. विनोद पेठकर, गौशाळा व्यवस्थापक श्री. दुर्बाकूर चाळके आणि अध्यक्ष श्री. राजेश आयरे यांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
गौशाळेच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी दोन बोअरवेल उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच, गौशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी डांबरीकरणाची मागणीही व्यक्त करण्यात आली. या मागण्या ऐकून श्री. दीक्षित यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच या कामांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीसाठी विश्वस्त श्री. रवींद्र इनामदार यांचे विशेष प्रयत्न लाभले. श्री. दीक्षित यांच्या या भेटीमुळे गौशाळेच्या प्रकल्पांना नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.