
देवरूखातील सोळजाई हॉटेलला शॉर्टसर्कीटमुळे आग
साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान
संगमेश्वर:-शहरातील मार्लेश्वर पेट्रोल पंपासमोर असलेले सोळजाई हॉटेल शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने, देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन बंब यामुळे आग आटोक्यात आली. हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुयश शिंदे हे हॉटेल चालवत होते. गेली दोन दिवस हॉटेल बंद होते.देवरूख-साखरपा या मुख्य मार्गालगत हे हॉटेल आहे. शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मार्गावरून प्रवास करणा-या नागरिकांना हॉटेलमधून धुर तसेच आगीच्या ज्वाला दिसून आल्या. शनिवारी दत्तनगर येथे कबड्डी स्पर्धा सुरू होती. ही घटना दत्तनगर येथील तरुणांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तत्काळ मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिकांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र हॉटेलमध्ये असलेले जेवणाचे साहित्य, फ्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. हॉटेल बंद असल्याने शिंदे यांनी सिलेंडर घरी नेले होते. यामुळे अनर्थ टळला. शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजुला पवार यांचे टायरचे दुकान होते. आग आटोक्यात आल्याने पवार यांचे दुकान आगीतून बालंबाल बचावले आहे. शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.