
राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत स्वरा साखळकरला दोन सुवर्ण पदके
रत्नागिरी : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकर हिने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत कायम आपला ठसा उमटवणाऱया स्वराने राष्ट्रीय स्पर्धेतही आपला दबदबा निर्माण केला आहे. क्युरोगी प्रकारात आक्रमक खेळ करत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली तर पुमसे प्रकारात नागालँडच्या खेळाडूचा पराभव करत तिने दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वॉंदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वॉंदो अकॅडमी ऑफ वास्को यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्फ्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे 12 ते 15 डिसेंबर दरम्यान पार पडली. देशभरातून नागालँड, तामिळनाडू, पंजाब, आसाम यांसह विविध राज्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होत़े स्वरा हिने जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर एकूण 52 पदकं मिळवली आहेत. स्वरा ही दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता 6 वी मध्ये शिकत आहे.