
राज्यातील पहिले थ्रीडी मल्टीमिडिया लेझर शो चे दालन रत्नागिरीत
नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच होणार खुले
रत्नागिरी शहराचे पर्यटन वाढावे यासाठी तारांगण, छ.संभाजी महाराज पुतळा, श्री विठुरायाचा पुतळा ही कामे मार्गी लागल्यानंतर आता थिबा पॅलेसमध्ये थ्रीडी मल्टीमीडिया लेझर शोचे नवे दालन सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. माजी उद्योगमंत्री उदय सामंत तथा विद्यमान आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागत आहे. येथील सुमारे अडीच एकर जागेत हे दालन उभारण्यात येत आहे.
या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाने तत्वत मान्यता दिल्यानंतर इमारतीसमोरील प्रांगणातील रिकाम्या जागेत मल्टीमीडिया लेझर शो साठी बांधकाम सुरू झालेले आहे. थिबा पॅलेसमध्ये मल्टिमीडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे. थिबापॅलेस हे ऐतिहासिक ठिकाण आहे. या इमारतीला हजारो पर्यटक भेट देऊन तेथील म्युझियमचा आनंद घेतात. पण आता थिबापॅलेस या नव्या शोमुळे चर्चेत येणार आहे. 1 हजार आसन व्यवस्था असलेले हे दालन निर्माण केले जात आहे. तसेच रमणीय गार्डनची निर्मिती केली जाणार आहे. यातून थिबापॅलेसलाही आकर्षक साज चढणार आहे.
पॅलेसच्या इमारतीसमोरील रिकाम्या जागेत मल्टीमीडिया शोचे सादरीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पात थिबा पॅलेसचा दर्शनी भाग हा पडदा म्हणून वापरण्यात येणार आहे. मल्टिमीडिया शोमध्ये सात भारतरत्नांचा इतिहास, थिबापॅलेस, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दाखवण्यात येणार आहे. अंदमानमध्ये अशा पद्धतीने थ्रीडी मल्टीमीडिया लेझर शोचे सादरीकरण केले जाते. नागपुरातील फुटाळा येथे नागपूरचा इतिहास दाखवण्यात येतो. याच धर्तीवर
रत्नागिरीत या जागेवरती काळोखात अर्ध्या तासाचा हा लेझर शो सादर केला जाईल. रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे नवनवीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांनी लक्ष वेधलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराची स्मार्ट सिटीच्यादृष्टीने घोडदौड सुरू आहे.