
चिपळूणच्या अथर्व कुळेला किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
राज्यस्तरीय स्पर्धेत करणार कोल्हापूर विभागाचे नेतृत्व
चिपळूण
महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यातर्फे नुकत्याच सातारा येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दलवाई हायस्कूलच्या अथर्व कुळे याने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तो लवकरच राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार आहे.
या स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात दलवाई हायस्कूलच्या अथर्व कुळे व सोहम अरमरे या दोन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 35 किलो वजनी गटात साताराविरुद्ध रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये अंतिम स्पर्धेची लढत झाली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणारा दलवाई हायस्कूलचा खेळाडू अथर्व कुळे याने प्रतिस्पर्धी खेळाडूवर 11-17 अशा गुणांनी विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले. त्याला क्रीडा शिक्षक बबन आगाव, सुभाष मते, मोहन पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक रोहित जाधव, संस्था पदाधिकाऱ्यांनी अथर्व कुळे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.