
तुळसणी येथील तरुणाच्या अपघाती मृत्यूने मुकादम कुटुंबावर दुःखाचा डोंगर
धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर : तालुक्यातील तुळसणी येथील एका उमद्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरासह मुकादम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तुळसणी येथील प्रसिद्ध हिना पोल्ट्री फार्मचे मालक अमीर मुकादम (35, तुळसणी) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत अमीर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला ठोकर देऊन अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर शनिवारी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिर मुकादम यांचा तुळसणी येथे पोल्ट्री व्यवसाय आहे. कामानिमित्त ते शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकीवरून तुळसणीहून बावनदीच्या दिशेने जात होता. देवरूख रत्नागिरी मार्गावरील वायंगणे फाटा येथे अज्ञात वाहनाने अमीर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामुळे अमिर दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. अपघाताची भीषणता पाहून भयभीत झालेल्या अज्ञात वाहन चालकाने तेथून धुम ठोकली.
या मार्गावरून ये- जा करणाऱ्या स्थानिकांना दुचाकी व अमिर पडलेला दिसून आला. तत्काळ त्याला उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अमिर याला मृत घोषीत केले. अमीरच्या मृत्यूची बातमी त्याच्या मित्र परिवाराने रत्नागिरीत धाव घेतली. त्याचे उक्षी, डीगनी येथील नातेवाईकांसह अनेक बांधव रत्नागिरीत जमा झाले होते.
या अपघाताची खबर अजय सुर्वे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली. यानुसार अज्ञात वाहन चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 106, 281, 125अ, 125 ब, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 ब, 187 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँन्सटेबल संजय मारळकर करीत आहेत.
कुटुंबाचा आधारवड हरपला
उक्षी येथील काझी यांच्या मुलीचा अमीर सोबत ,…….. वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याला दोन लहान मुली आहेत. या दोन मुलींचा आधार हरपला आहे. तसेच मुकादम कुटुंबाचा भार अमिर याच्या खांद्यावर होता. या कुटुंबाचा आधारवडच हरपल्याने मुकादम कुटुंब दुःखाचा सागर बुडाले आहे.