
काजळी नदीपात्रात मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील चांदेराई येथील काजळी नदीच्या पात्राशेजारी झाडीझुडपात बसून मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंडू रत्नु सांडीम (वय ५८, रा. चांदेराई, रत्नागिरी) असे मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास काजळी नदीपात्राच्या शेजारी झाडीझुडपात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धोंडू सांडीम हे काजळी नदीतील झाडीझुडपाच्या आडोशाला मद्य प्राशन करताना आढळले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार संजय शिवगण यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.