
खेड-विन्हेरे फाट्यानजीक अपघातात ५ जखमी
खेड:
मुंबई-गोवा महामार्गावरील विन्हेरे फाट्यानजीक टेम्पो ट्रॅव्हलरचा टायर फुटून समोरील सिमेंटच्या कठड्यावर आदळत झालेल्या अपघातात ५जण जखमी झाले. दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हलर चालक शैलेश संपत बिरामणे (रा. कोपरखैरणे-मुंबई) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीन त्रिभुवनदास (५७), संगीता नितीन रायदुरा, संगता ओमप्रकाश गोंडाणे, चेतना जितेंद्र ठाकूर, सतीश विठ्ठलराव सकसुळे (सर्व रा. अमरावती) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. चालक शैलेश बिरामणे हा टेम्पो ट्रॅव्हलरमधून ५ जणांना घेवून गोवा ते मुंबई असा प्रवास करत असताना विन्हेरे फाट्यानजीक भरधाव वेगातील ट्रॅव्हलरचा टायर फुटून चालकाचा ताबा सुटला. ट्रॅव्हलरच्या चालकाकडील बाजूचे चाक दुभाजकावर घासून सिमेंटच्या कठड्यावर जावून आदळले. या अपघातात ट्रॅव्हलरमधील पाचहीजणांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले.