
बसणीत बगाडा उत्सव उत्साहात
रत्नागिरी
तालुक्यातील बसणी बारा वाड्यांचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी-रवळनाथ आणि पंचायतन देवस्थानचा बगाडा जत्रोत्सव शनिवारी उत्साहात साजरा झाला. या वेळी लाट फिरवण्याचा चित्तथरारक कार्यक्रम झाला. अनेक भक्त लाटेवर स्वार झाले आणि त्यांनी थरारक कसरती केल्या.
गणपतीपुळे मार्गावरील बसणी गावी श्री देवी महालक्ष्मी रवळनाथ पंचायतन देवस्थान आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदा हा उत्सव उत्साहात साजरा झाला. सकाळी देवांना रूपे लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारी लाट फिरवण्यात आली. भाविक व तरुण उंच लाटेवर स्वार झाले व लाट गोल फिरवण्यात आली. दुपारनंतर देवीची आटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. सायंकाळी भाविकांनी भजने म्हटली. राखण देण्याचा कार्यक्रमही झाला. धूपारत, गाऱ्हाणे होऊन जत्रेची सांगता झाली. बगाडा उत्सवानिमित्त खल्वायन संस्थेने स्वप्नपक्षी हे नाटक सादर केले. या वेळी रसिकांची गर्दी झाली होती.